मुंबई: कोकणातील सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी राज्याचे फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये सुपारी पिकाचा समावेश करण्याची आग्रही मागणी केली आहे. याप्रसंगी कोकण विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे देखील उपस्थित होते.
आमदार निकम यांनी मंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की, सध्या राज्य पुरस्कृत स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवली जात असली तरी, त्यात सुपारी पिकाचा समावेश नाही. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. सध्या बदलत्या हवामान परिस्थितीमुळे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे अनेक शेतकरी सुपारी लागवडीकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत जर या पिकाचा समावेश योजनेत केला, तर कोकणातील हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल, असे निकम यांनी निदर्शनास आणून दिले.
आमदार निकम यांनी मांडलेल्या या मुद्द्याची दखल घेत मंत्री भरतशेठ गोगावले यांनी संबंधित विभागामार्फत या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आमदार शेखर निकम सातत्याने प्रयत्नशील असून, सुपारी उत्पादकांच्या या मागणीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
