प्रत्येक गावात उभारणार ‘वेदर स्टेशन’; फळपीक विमा नियोजनासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Gramin Varta
83 Views

मुंबई: फळपीक विमा योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने आता महत्त्वाचे पाऊल उचलले असून, राज्यातील प्रत्येक गावात ‘वेदर स्टेशन’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मंत्रालयात आयोजित एका विशेष बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आमदार मनीषा चौधरी, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील विमा योजनेतील अनियमितता आणि प्रलंबित तक्रारींचा आढावा घेत असताना, डहाणू व बोईसरमधील शेतकऱ्यांच्या तक्रारींची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गावागावांत हवामान केंद्रे कार्यान्वित झाल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि विम्याचे निकष यांची अचूक सांगड घालणे शक्य होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य भरपाई मिळेल, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला. विमा कंपन्या आणि बँकांमध्ये योग्य समन्वय राखत कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काटेकोर खबरदारी घेण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *