संगमेश्वर : तालुक्यातील काटवली या छोट्याशा गावातील सुपुत्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) संगमेश्वरचा माजी विद्यार्थी सुजित जाधव याने आपल्या जिद्द आणि कौशल्याच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. स्पेनमधील एका नामवंत आंतरराष्ट्रीय पॅसेंजर शिप कंपनीत ‘असिस्टंट प्लंबर’ या पदावर सुजितची निवड झाली असून, या यशाने संगमेश्वर तालुक्याचा लौकिक जागतिक स्तरावर उंचावला आहे.
या जागतिक दर्जाच्या कामासाठी सुजितला प्रतिमहा एक लाखापेक्षा अधिक वेतन मिळणार आहे. ग्रामीण भागातून थेट आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपनीपर्यंतचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. या यशाबद्दल बोलताना सुजितने सांगितले की, आधुनिक युगात केवळ पदव्यांमागे न धावता तांत्रिक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे काळाची गरज आहे. फिटिंग, वेल्डिंग, प्लंबिंग आणि यांत्रिक काम यांसारख्या कौशल्यांना जगभरात मोठी मागणी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कितीही प्रगत झाली तरी मानवी हातांच्या तांत्रिक कौशल्याची जागा ती घेऊ शकत नाही, असे मत त्याने व्यक्त केले. व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या आय.टी.आय. सारख्या संस्थांमधून कौशल्य आत्मसात करून जागतिक स्तरावर यशस्वी होता येते, असा विश्वासही त्याने यावेळी व्यक्त केला. सुजित जाधवच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याधारित शिक्षणाबाबत एक नवा उत्साह निर्माण झाला आहे.
