मुंबई: राज्यात मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यानंतर पावसाने आता जोर धरला असून, पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही दमदार पावसाचा अंदाज आहे. मुंबईमध्ये आगामी चार दिवस धुवांधार पावसाची शक्यता असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने ३ आणि ४ जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे, तर मुंबईसाठीही उद्याच्या दिवसाकरिता असाच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातही पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट असून, पावसामुळे भातलावणीच्या कामांना वेग येणार आहे. तसेच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणीटंचाईची समस्या काही अंशी निवळली आहे.
महाराष्ट्र किनारपट्टीलगत अरबी समुद्रावर निर्माण झालेली चक्रीय स्थिती आणि मध्य प्रदेश ते अरबी समुद्रापर्यंत सक्रिय असलेली द्रोणीय रेषा यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. गेल्या २४ तासांत कोकणातील म्हसळा, दापोली, मंडणगड, खेड आणि पनवेलमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावर लोणावळा, डुंगरवाडी आणि ताम्हिणी भागातही पावसाचा जोर कायम आहे.
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी ३ ते ७ जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असून, यात मुंबई, पुणे, नाशिक, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचा समावेश आहे. जून महिन्यात पावसाची मोठी तूट राहिल्याने शेतकरी वर्गाची चिंता कायम आहे, मात्र सध्याच्या पावसाच्या हजेरीमुळे ही तूट भरून निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांनी हवामानाच्या या बदलाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
