तुकाराम मुंढे यांचा धडाका; महिनाभरात ५ कोटींहून अधिकचा प्रतिबंधित गुटखा जप्त, ४५७ जणांना अटक

Gramin Varta
86 Views

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या तस्करीविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. २५ मे ते २४ जून या एका महिन्याच्या कालावधीत राज्यभरातील विविध विभागांत ४४६ आस्थापनांवर एफडीएच्या पथकांनी धडक धाडी टाकल्या आहेत. या व्यापक कारवाईदरम्यान तब्बल ५ कोटी ५५ लाख ५ हजार २९४ रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी आतापर्यंत ४५७ जणांना अटक करण्यात आली आहे.

एफडीएने मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या सातही विभागांत ही मोहीम राबवली. यामध्ये सर्वाधिक कारवाई कोकण आणि मुंबई विभागात करण्यात आली असून, नाशिक आणि अमरावती विभागांतही मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला आहे. नाशिक विभागात १ कोटी ४३ लाख २६ हजार ६०६ रुपये तर अमरावती विभागात १ कोटी १४ लाख ७१ हजार ५०२ रुपये किमतीचा गुटखा व पानमसाला पकडण्यात आला. तसेच, छत्रपती संभाजीनगर विभागात कारवाई दरम्यान १३ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. नियमभंग करणाऱ्या विक्रेत्यांवर आणि व्यावसायिकांवर एफडीएने थेट कारवाई केल्यामुळे गुटखा माफियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यभरातील ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *