मीरा रोड: कारची तांत्रिक तपासणी करत असताना एअरबॅग अचानक उघडल्यामुळे मानेला गंभीर दुखापत होऊन २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहित सुरेश सोनी असे मृत तरुणाचे नाव असून, तो मीरा रोडवरील टियारा हिल्स हाउसिंग सोसायटीमध्ये राहत होता. जुन्या गाड्यांच्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मोहित यांनी विक्रीसाठी आणलेली एक कार तपासणीसाठी काशिमिरा येथील प्लेझंट पार्क सोसायटीजवळ रस्त्याच्या कडेला थांबवली होती.
तपासणी सुरू असताना स्टिअरिंग व्हीलमधील एअरबॅग अचानक उघडली. एअरबॅगच्या कव्हरचा प्रचंड वेगाचा झटका मोहित यांच्या मानेच्या उजव्या बाजूला बसला. या आघाताची तीव्रता इतकी जोरदार होती की, त्यांना गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून, तांत्रिक बिघाडामुळे एअरबॅग अचानक उघडली की अन्य काही कारणांमुळे हा अपघात घडला, याचा तपास पोलीस करत आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
