रत्नागिरी: नद्यांमधील प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पर्यावरण शास्त्र विभागाचे संशोधक डॉ. पांडुरंग यशवंत पाटील यांनी विकसित केलेल्या मायक्रोप्लास्टिक वर्गीकरण उपकरणाला भारत सरकारकडून अधिकृत डिझाईन पेटंट मंजूर करण्यात आले आहे. या यशामुळे नदी संवर्धनाच्या क्षेत्रात रत्नागिरी उपकेंद्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.
नद्यांच्या प्रवाहात साचणारे ५ मिलीमीटरपेक्षा लहान मायक्रोप्लास्टिक कण अत्यंत घातक ठरत असतात. डॉ. पाटील यांनी तयार केलेले हे नाविन्यपूर्ण उपकरण नद्यांच्या प्रवाहात हे सूक्ष्म प्लास्टिक कण अचूकपणे अडवून त्यांचे पद्धतशीर वर्गीकरण करण्यास सक्षम आहे. नदीतील नैसर्गिक जैविक कचरा जसे की पालापाचोळा आणि काड्या यांपासून प्लास्टिकचे कण वेगळे करण्यासाठी यामध्ये ‘मल्टी-स्टेज फिल्टरेशन’ ही विशेष संकल्पना वापरण्यात आली आहे. भविष्यात हे उपकरण अधिक प्रगत करतानाच सौर ऊर्जेवर चालणारे, स्वयंचलित फिल्टर क्लीनिंग आणि रिअल-टाइम डेटा देणारे स्मार्ट सेन्सर्स बसवण्याचे नियोजित आहे.
कोकण किनारपट्टीवरील संवेदनशील नदी परिसंस्थांच्या संरक्षणासाठी हे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरणार आहे. शाश्वत पर्यावरण रक्षणासाठी नद्यांच्या पातळीवरच प्लास्टिकचे प्रदूषण रोखणे ही काळाची गरज असून, हे डिझाईन पेटंट उपकरणाच्या प्रत्यक्ष निर्मितीच्या दिशेने पडलेले पहिले मोठे पाऊल आहे. या संशोधनामुळे भविष्यात नदी प्रदूषण नियंत्रणाच्या मोहिमेला नवी दिशा आणि गती मिळणार असल्याचे संशोधक डॉ. पांडुरंग पाटील यांनी सांगितले.
