दापोली-हर्णे मार्गावर केबल खोदाईमुळे जीवघेणी भगदाडे; ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा प्रवाशांना फटका

Gramin Varta
24 Views

दापोली: दापोली-हर्णे या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गावर एमएसईबीच्या भूमिगत केबल खुदाईनंतर रस्त्याची योग्य दुरुस्ती न केल्यामुळे प्रवाशांचे प्राण टांगणीला लागले आहेत. धाकटी आंबवली परिसरात खोदकाम केल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याऐवजी केवळ माती टाकून थातूरमातूर काम केल्याने, पावसाळ्यात ही माती वाहून गेल्याने रस्त्याला ठिकठिकाणी मोठी भगदाडे पडली आहेत. या निष्काळजीपणामुळे हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून, अपघातांची मालिका सुरू झाली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, केबलचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने रस्ता दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. सध्या या मार्गावर चार ते पाच ठिकाणी मोठी आणि धोकादायक भगदाडे पडली आहेत. पावसाच्या पाण्याने हे खड्डे भरलेले असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अनेक दुचाकीस्वार घसरून गंभीर जखमी होत आहेत. काही दिवसांपूर्वी एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची घटना ताजी असतानाच, गेल्या दोन दिवसांतही अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

शालेय विद्यार्थी, पर्यटक आणि दैनंदिन कामासाठी ये-जा करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. मात्र, कंत्राटदाराच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपयांची कामे करणाऱ्या कंपन्या आणि त्यांना मोकळीक देणारी यंत्रणा आता जाब देणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाने तातडीने या मार्गाची पाहणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि रस्ता कायमस्वरूपी दुरुस्त करून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी यंत्रणेने जागे होणे गरजेचे आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *