दापोली, खेड, मंडणगडमधील प्रलंबित ऊर्जा कामांना गती देण्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश

Gramin Varta
37 Views

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड आणि मंडणगड या तालुक्यांतील प्रलंबित ऊर्जा कामांना गती देत वीज वितरण आणि पायाभूत सुविधांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामे करण्याचे स्पष्ट निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले आहेत. ऊर्जा राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या तीनही तालुक्यांतील ऊर्जा विषयक कामांचा आढावा घेण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या महत्त्वपूर्ण बैठकीस गृह राज्यमंत्री योगेश कदम, महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढीकर, संचालक डी. व्ही. पडळकर, सतीश चव्हाण, कोकण विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक जगदाळे, मुख्य अभियंता डोळे आणि कावळे यांच्यासह ऊर्जा विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत राज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोली येथील उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्यासाठी एक सकारात्मक प्रस्ताव पाठवावा, तसेच समुद्र किनाऱ्या जवळील जुन्या वीज वाहक लाईन रस्त्यालगत घेण्याबाबत प्रशासनाला सूचित केले.

या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, दापोली, खेड, मंडणगड तालुक्यात वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी सुरू असलेली कामे, नवीन उपकेंद्रे, उच्च व लघुदाब वीजवाहिन्यांची उभारणी, रोहित्रांची उपलब्धता आणि कृषी व घरगुती वीज जोडण्यांशी संबंधित सर्व प्रकरणे अतिशय संवेदनशीलतेने हाताळून विनाविलंब पूर्ण करावीत. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या विविध मागण्या वेळेत मार्गी लावणे आवश्यक आहे. या भागात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यावर तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्या आणि आवश्यक तेथे कव्हर कंडक्टर लावण्याची कार्यवाही त्वरित करावी, असेही त्या म्हणाल्या. नागरिकांना सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *