नवनिर्माण कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम; विद्यार्थ्यांकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन

Gramin Varta
91 Views

रत्नागिरी: सध्याच्या पावसाळी वातावरणात वाढणाऱ्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर, नवीन वाहनचालक असलेल्या युवक-युवतींचे प्रबोधन करण्यासाठी ग्राहक पंचायत रत्नागिरी आणि विभागीय परिवहन कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्माण कॉलेज येथे विशेष रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते.

कार्यक्रमादरम्यान, परिवहन विभागाचे वाहन निरीक्षक पाटील आणि शिंदे यांनी दृकश्राव्य चित्रफितींच्या माध्यमातून अपघातांची तीव्रता आणि ते टाळण्याचे उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन केले. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास स्वतःसह इतर प्रवाशांचे प्राण वाचवता येतात, यावर भर देत त्यांनी अपघातांच्या कारणांची तांत्रिक माहिती दिली. रस्ते अपघातांमध्ये सुमारे २४ टक्के अपघात हे पादचाऱ्यांच्या संदर्भात घडत असल्याचे नमूद करत, रस्त्यावरून चालताना उजव्या बाजूने चालणे आणि पादचाऱ्यांसाठी असलेल्या नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे उपस्थितांना पटवून देण्यात आले.

या उपक्रमाची भूमिका श्रद्धा कळंबटे यांनी मांडली, तर फैयाज खतीब यांनी रस्ते सुरक्षेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, प्राचार्य संजय गव्हाळे, उल्हास सप्रे, पर्यवेक्षक सुकुमार शिंदे आणि ग्राहक पंचायतीचे संजय वैशंपायन, अनंत भडकमकर व गोविंद गाडगीळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मालगुडकर यांनी केले, तर सत्यवान कोत्रे यांनी आभार मानले.

- Advertisement -
Total Visitors :
4833825
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *