चिपळूण सायकलिंग क्लबच्या अध्यक्षपदी आयर्नमॅन प्रशांत दाभोळकर यांची बिनविरोध निवड; कार्यकारिणीतही मोठे फेरबदल

Gramin Varta
17 Views

चिपळूण: चिपळूण सायकलिंग क्लबच्या अध्यक्षपदी आयर्नमॅन प्रशांत दाभोळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. क्लबच्या कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण फेरबदल करत उपाध्यक्षपदी प्रसाद आलेकर, सहसचिवपदी स्वप्निल गायकवाड आणि खजिनदारपदी योगेश ओसवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पार पडलेल्या बैठकीत आणि त्यानंतर क्लबच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेहसंमेलनात या नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

क्लबचे माजी अध्यक्ष विक्रांत आलेकर यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड प्रक्रिया पार पडली. नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दाभोळकर हे क्लबच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे नेतृत्व असल्याने सर्व संचालक मंडळाने त्यांच्या नावाला एकमताने मंजुरी दिली. ज्येष्ठ सदस्य प्रा. श्रीराम दांडेकर यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दाभोळकर यांनी क्लबच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि सायकलिंग संस्कृती अधिक रुजवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला क्लबचे उपाध्यक्ष मनोज भाटवडेकर यांच्यासह तेजानंद गणपत्ये, चैतन्य गांगण, अहमद भाई शेख, अमित पेडणेकर, अंकुश जंगम आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सौ. भारती टारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष मनोज भाटवडेकर यांनी केले. चिपळूण सायकलिंग क्लबची ही नवी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे: अध्यक्ष – प्रशांत दाभोळकर, उपाध्यक्ष – मनोज भाटवडेकर, प्रसाद आलेकर व निशा आंबेकर, सचिव – भारती टारे, सहसचिव – स्वप्निल गायकवाड, खजिनदार – योगेश ओसवाल आणि संचालक – विक्रांत आलेकर व डॉ. मनीषा वाघमारे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *