ब्रेकिंग : मुंबई-गोवा महामार्गाच्या ढिसाळ कामाचा फटका: उक्षी पुलाजवळ चिखल आणि मातीचे साम्राज्य

Gramin Varta
382 Views

दुचाकी घसरल्या,वाहनचालकांचे हाल!


रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत धिम्या आणि ढिसाळ गतीने सुरू असल्याचा फटका आता सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालकांना बसू लागला आहे. महामार्गावरील उक्षी पूल परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि माती साचल्याने वाहनचालकांचे हाल होत असून, हा रस्ता आता अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे.

या परिसरात महामार्गाच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे, परंतु ते पूर्णपणे अर्धवट अवस्थेत आहे. कामाच्या नियोजनातील त्रुटींमुळे माती आणि चिखल थेट रस्त्यावर वाहून येत आहे. विशेष म्हणजे, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा चर (ड्रेनेज) खोदण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी थेट महामार्गावरून वाहत असून, त्यासोबत डोंगरातील माती आणि चिखल रस्त्यावर साचत आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ता निसरडा झाल्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांच्या घसरण्याचे प्रमाण वाढले असून, या परिसरात कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदाराने याकडे वेळीच लक्ष देऊन पावसाळी नियोजनासह रस्त्यावरील चिखल तत्काळ हटवावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *