ब्रेकिंग:लांजा:वाकेड घाटात पेट्रोल पंपाच्या कामादरम्यान दरड कोसळली; वृद्ध व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Gramin Varta
1979 Views

युद्ध पातळीवर शोध सुरू

लांजा/ अरबाज नेवारेकर: लांजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाकेड बौद्धवाडीजवळ महामार्गालगत सुरू असलेल्या पेट्रोल पंपाच्या कामाच्या ठिकाणी दरड कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दरडीखाली एक वृद्ध व्यक्ती अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाकेड घाटात पेट्रोल पंपाचे काम सुरू होते. या ठिकाणी कामाच्या ठिकाणी एक केबिन उभारण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे या केबिनच्या आडोशाला एक वृद्ध व्यक्ती आश्रयासाठी थांबली होती. याच दरम्यान डोंगराचा काही भाग अचानक खचून दरड कोसळली. या दुर्घटनेत केबिनच्या बाजूला बसलेला वृद्ध व्यक्ती दरडीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याचे समजते. सुदैवाने, या ठिकाणी काम करणारे जेद अतिकुल त्यागी (वय १८), सुवेल अयुब त्यागी (वय १९) आणि महंमद समीन साहवेज (वय २२) हे तीन कामगार सुरक्षित आहेत.

घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. बगळे यांनी तातडीने आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी जेसीबी यंत्रणा आणि लांजा येथील आपत्कालीन व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक तहसीलदार प्रियंका ढोले यांनीही तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. दरडीखाली अडकलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *