आश्रयाला आला अन् जीव गमावून बसला
लांजा : तालुक्यातील वाकेड येथील लक्ष्मीबाग परिसरात मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत एका ५० ते ५५ वयोगटातील अनोळखी वृद्धाचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. ४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास सदर अनोळखी व्यक्ती पावसात भिजलेल्या अवस्थेत पेट्रोल पंपावरील केबिनमध्ये आश्रयाला आली होती. केबिनमध्ये असतानाच अचानक दरड कोसळल्याने मातीचा मोठा ढिगारा केबिनवर आला आणि ती पूर्णपणे दबली गेली. या भीषण अपघातात त्या इसमाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची खबर वाकेडचे पोलीस पाटील जयवंत भिकाजी जाधव यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड यांनी मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा पूर्ण केला असून, मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्तीचे वय ५० ते ५५ वर्षांच्या दरम्यान असून, त्यांचा बांधा सडपातळ, रंग सावळा आणि दाढी वाढलेली व पिकलेली आहे. या प्रकरणी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ नुसार लांजा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
