पाताळगंगा नदीच्या पुरात अडकलेल्या एसटी बसमधील आठ प्रवाशांचा रसायनी पोलिसांकडून जीवदान

Gramin Varta
174 Views

रायगड : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला आलेल्या पुरात कर्जत-पेण मार्गावरील सारसई येथे एक एसटी बस अडकल्याची थरारक घटना रविवारी घडली. पुराचे पाणी अचानक रस्त्यावर आल्याने बस मधोमध अडकून पडली होती, मात्र रसायनी पोलिसांनी प्रसंगावधान राखून धाडसी बचावमोहीम राबवत बसमधील आठ प्रवाशांची सुखरूप सुटका केली. घटनेची माहिती मिळताच रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह याची कोणतीही तमा न बाळगता पोलिसांनी हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांच्या मदतीने बचावकार्य हाती घेतले. नियोजित पद्धतीने राबवलेल्या या मोहिमेत बसमधील सर्व आठ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. विशेष म्हणजे, या प्रवाशांमध्ये एका ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेचाही समावेश होता, ज्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या खांद्यावर उचलून पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.

पोलिसांच्या या तत्परतेचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या बचाव मोहिमेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सुटका झालेल्या प्रवाशांनी रसायनी पोलिसांच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुराचे पाणी असलेल्या रस्ते व पुलांवरून प्रवास करणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन रसायनी पोलिसांनी केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *