रत्नागिरी: रत्नागिरीत सध्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने थैमान घातले असून, या वादळी पावसाचा मोठा फटका नूतनीकरण करण्यात आलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकाला बसला आहे. ५ जुलै रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास जोरदार वाऱ्यामुळे रेल्वे स्थानकाचे नवीन छत अचानक कोसळल्याची थरारक घटना घडली. या दुर्घटनेनंतर स्थानक परिसरात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, विशेषतः रिक्षा स्टँडकडील काही भागात यामुळे पूर्णपणे अंधार पसरला होता. सुदैवाने, पाऊस सुरू असल्याने आसऱ्यासाठी तिथे थांबलेल्या प्रवाशांनी आणि नागरिकांनी छत कोसळत असल्याचे लक्षात येताच तातडीने तिथून बाजूला पळ काढल्याने कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे स्थानकावर प्रवाशांची वर्दळ कमी होती, मात्र दिवसाच्या वेळी ही दुर्घटना घडली असती तर प्रवाशांची, रिक्षाचालकांची आणि सामान्यांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती आणि मोठे नुकसान सहन करावे लागले असते. या घटनेमुळे स्थानकाच्या बांधकामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
