राज्यात मुसळधार पावसाचे थैमान; मुंबई-गोवा महामार्गासह द्रुतगती मार्ग बंद, मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला

Gramin Varta
476 Views

मुंबई: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून कोकण, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि घाटमाथा परिसरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने, रस्ते पाण्याखाली गेल्याने आणि वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणजवळील खवटी परिसरात मोठी दरड कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली असून गेल्या १० ते १२ तासांपासून वाहनचालक आणि प्रवासी अन्न, पाणी व इंधनाविना रस्त्यावर अडकून पडले आहेत. प्रशासन पहाटेपासून दरड हटवण्याचे काम करत असले तरी सततच्या पावसामुळे आणि खराब हवामानामुळे कामात मोठे अडथळे येत आहेत. दुसरीकडे, परशुराम घाटातील ओमेगा हॉटेललगतच्या डोंगरातून माती आणि मोठे दगड खाली येत असल्याने येथे आणखी मोठी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाचा जोर कायम असल्याने रायगड जिल्ह्यातील खोपोली-पेण महामार्गही पाण्याखाली गेला आहे. पाताळगंगा आणि भोगावती नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सारसन ते इसांबा फाटा दरम्यानचा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. महाड शहरातही सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शहरातील बाजारपेठा आणि आजूबाजूच्या शेतीमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पालाही या पावसाचा मोठा फटका बसला असून, प्रकल्पातील एका भागाचा स्लॅब खचल्याने प्रचंड पाणी आणि माती आत शिरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोणावळा व घाटमाथा परिसरातील तीव्र हवामानामुळे प्रशासनाने नागरिकांना द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले आहे, तर काही रेल्वे मार्गांवरही दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.


याच मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. फलटण-पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात मुसळधार पावसामुळे डोंगरावरील एक मोठा दगड सैल होऊन चालत्या कारवर कोसळल्याने बारामती येथील आंबे खुर्द रहिवासी असलेले चालक योगेश पोपट जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. दगड वाहनाच्या पुढील काचेवर आदळल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या दिशादर्शक फलकावर जाऊन धडकली. या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. हवामान विभागाने कोकण आणि घाटमाथा परिसरात पुढील काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असून, नागरिकांनी डोंगराळ भाग, घाट रस्ते आणि नदीकाठच्या परिसरात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *