संगमेश्वर/ वहाब दळवी: संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील एसटीबीए (STBA) काउंटरचे लायसन्सधारक मंदार मोहन रहाटे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संगमेश्वर तालुका भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. मंदार रहाटे यांनी लायसन्स मिळवताना सादर केलेले पोलिस व्हेरिफिकेशन जुने असून, त्यानंतरच्या काळात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. याशिवाय, रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) त्यांना रेल्वे स्थानक परिसरात तत्काळ बुकिंग करताना पकडून नियमानुसार कारवाईही केली होती.
अशा व्यक्तीकडे एसटीबीए काउंटरचे लायसन्स कायम ठेवणे हे रेल्वे प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. या संदर्भात भाजपचे संगमेश्वर उत्तर तालुका अध्यक्ष विनोद म्हस्के आणि तालुका अध्यक्ष मिथुन निकम यांनी महिनाभरापूर्वीच रेल्वे स्टेशन मास्टर, जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन सखोल चौकशीची व लायसन्स रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून आजवर कोणतीही कारवाई झाली नाही. या दिरंगाईचा निषेध करत बुधवारी सायंकाळी विनोद म्हस्के आणि स्वप्नील सुर्वे यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने संगमेश्वर रेल्वे स्थानकावर भेट दिली आणि स्टेशन मास्टर जाधव यांच्याकडे जाब विचारला. यावेळी स्टेशन मास्टर यांनी याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे सांगत आरपीएफ अधिकारी आणि आरएमएम बापट यांच्याकडे चौकशी करण्यास सांगितले.
यावर भाजप पदाधिकाऱ्यांनी तक्रार वहीची मागणी केली, मात्र ती केवळ तिकीटधारकांना दिली जाते असे सांगण्यात आले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी प्लॅटफॉर्म तिकीट काढून तक्रार वहीत मंदार रहाटे यांच्याबाबत सविस्तर तक्रार नोंदवली. यावेळी भाजपचे रुपेश कदम, मिथुन निकम, दत्ताराम नार्वेकर, अमित ताठरे, सतीश पटेल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
