मंडणगड: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) ढिसाळ कारभारामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे कोकणच्या पर्यटनासाठी आणलेली तब्बल एक कोटी रुपयांची हाऊसबोट सध्या वापराविना सडत पडली आहे. २०१६-१७ या काळात मंडणगड तालुक्यातील वेसवी बंदरात जलपर्यटनाला चालना देण्यासाठी ही हाऊसबोट खरेदी करण्यात आली होती. कोकणच्या निसर्गसौंदर्याचा पर्यटकांना आनंद घेता यावा, हा यामागचा मुख्य उद्देश होता. मात्र, प्रशासनाच्या जाचक अटींमुळे ही महत्त्वाकांक्षी संकल्पना केवळ कागदावरच राहिली आणि अखेर सरकारी तिजोरीतील एक कोटी रुपयांचा निधी मातीमोल झाला आहे.
एमटीडीसीने ही हाऊसबोट चालविण्यासाठी ठेकेदार नेमण्याचे ठरवले होते, परंतु त्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांची अनामत रक्कम (डिपॉझिट) भरण्याची अट घातली होती. या व्यवसायातील अनिश्चितता आणि सुरुवातीचा टप्पा पाहता, एवढी मोठी रक्कम गुंतवण्यास कोणत्याही ठेकेदाराने रस दाखवला नाही. त्याशिवाय, १० तासांच्या जलपर्यटनासाठी आठ हजार रुपयांचे भाडे आणि त्यात जेवण, चहा-नाश्त्यासारख्या सेवांचा समावेश केल्यामुळे हा व्यवसाय फायदेशीर ठरेल का, याबाबत कंत्राटदारांमध्ये साशंकता होती. प्रशासनाने या अटी शिथिल करण्याबाबत किंवा भाडेरचनेत तडजोड करण्याबाबत कोणतीही लवचिकता न दाखवल्याने कुणीही हा ठेका घेण्यास पुढे आले नाही.
आज ही हाऊसबोट श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला खाडीमध्ये बेवारस अवस्थेत सडत पडली असून, तिची दुरवस्था पाहून पर्यटनाच्या नावाखाली कशा प्रकारे सरकारी पैशांची उधळपट्टी झाली आहे, हे स्पष्ट होत आहे. बाणकोट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच इस्माईल उंडरे आणि स्थानिक बोट व्यावसायिक बद्रुद्दीन उंडरे यांनी या परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एमटीडीसीने जर वेळीच व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला असता, तर आज कोकणच्या जलपर्यटनाला वेगळी दिशा मिळाली असती. मात्र, अधिकाऱ्यांच्या हट्टापायी आणि नियोजनशून्य कारभारामुळे पर्यटकांना या सेवेचा आनंद घेता आला नाही आणि महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे एक महागडी मालमत्ता अखेर भंगारात निघण्याच्या स्थितीत पोहोचली आहे.
