रत्नागिरी : खंडाळा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन बंद घरे फोडली

Gramin Varta
1010 Views

वैभव पवार / गणपतीपुळे : खंडाळा परिसरात चोरट्यांनी डोके वर काढत एकाच रात्री तीन बंद घरांना लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच देवरुखमध्येही सलग तीन घरे फोडल्याच्या घटना ताज्या असतानाच आता रत्नागिरीतही घरफोड्यांची मालिका सुरू झाल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, रात्रीच्या वेळी बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याची चर्चा सुरू आहे.

वाटद खंडाळा येथील रहिवासी राकेश शशिकांत पवार (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १२ जुलै रोजी रात्री १० ते १३ जुलै रोजी सकाळी ६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाज्यावरील कुलूप धारदार हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर गोदरेज कपाटातील सुमारे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे, किंमत सुमारे १३ हजार रुपये, चोरून नेले.

चोरीची माहिती मिळाल्यानंतर परिसरात चौकशी करताना फिर्यादींना आणखी धक्कादायक माहिती समोर आली. आदर्श नगर येथील शुभम श्रीकांत महाडीक यांचे मुंबईला गेल्याने बंद असलेले घर, तसेच श्रीराम नगर येथील मंदार श्रीकांत बारगुडे यांच्या बिअर शॉपीचे गोडाऊन आणि परेश चंद्रकांत गुरव यांचे बंद घरही चोरट्यांनी फोडल्याचे उघड झाले. त्यामुळे एकाच परिसरात सलग तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त होत आहे. या घटनांची नोंद जयगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा व जयगड पोलिस करत आहेत.

देवरुखनंतर आता रत्नागिरी शहरातही चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. घरफोड्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे आणि पोलिसांनी तातडीने प्रभावी उपाययोजना करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *