रत्नागिरी (प्रतिनिधी): नाणीज पंचक्रोशीतील माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींना एसटी बसमधून उद्धटपणे खाली उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे रत्नागिरी दक्षिण तालुकाध्यक्ष चिराग खटकुळ यांनी रत्नागिरी आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार करत संबंधित चालक व वाहकावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. १३ जुलै २०२६ रोजी दिलेल्या तक्रार अर्जात या गंभीर घटनेचा तपशील देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता लांजा आगाराची ‘पाली-घाटीवळे’ बस नाणीज बस थांब्याजवळ आली असता, चार विद्यार्थिनी बसमध्ये चढल्या होत्या. मात्र, बसच्या चालक आणि वाहकाने या विद्यार्थिनींशी अत्यंत उद्धट वर्तन केले.
विद्यार्थिनींकडे वैध त्रैमासिक पास असतानाही त्यांना अपमानास्पद भाषा वापरत बसमधून खाली उतरवण्यात आले. तसेच, पैसे देऊन तिकीट काढण्याची सक्तीही करण्यात आली. या घटनेमुळे घाबरलेल्या विद्यार्थिनी घरी रडत गेल्या असून, त्यांच्या मनावर मोठा मानसिक आघात झाला असल्याचे पालकांनी सांगितले आहे. याच वाहकाकडून यापूर्वीही अशा प्रकारची मुजोरी केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात विद्यार्थ्यांना असा त्रास सहन करावा लागणार नाही, अशी मागणी चिराग खटकुळ यांनी केली आहे.
यावेळी चिराग खटकूळ तालुकाध्यक्ष युवमोर्चा, भाजपा, रत्नागिरी दक्षिण, सुशांत पाटकर तालुका सरचिटणीस भाजप , रत्नागिरी दक्षिण, तालुकाध्यक्ष शिक्षक सेल विजय गावडे , भाजपा कार्यकर्ते श्रीराम दाणी इत्यादी उपस्थित होते.
