राजापूर पोलिसांची मोठी कामगिरी: सायबर फसवणुकीतील ३ लाखांची रक्कम परत मिळवून दिली

Gramin Varta
203 Views

राजापूर : माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक ॲड. जमीर खलिफे यांची झालेली सायबर फसवणूक उघड करत राजापूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत ३ लाख रुपयांची फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली आहे. या प्रकरणात पुणे व परिसरातील पाच संशयितांवर कारवाई करण्यात आली असून, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार शादाब अन्सारी अद्याप फरार आहे.

१६ एप्रिल २०२६ रोजी ॲड. जमीर खलिफे यांच्या वडिलांच्या व्हॉट्सॲपवर आरटीओ ई-चलनाची बनावट लिंक पाठवून हा फसवणुकीचा प्रकार घडला होता. सदर लिंक उघडताच ॲड. खलिफे यांच्या मोबाईलवर आधार ओटीपी आल्यानंतर त्यांच्या इंडसइंड बँकेच्या खात्यातून ३ लाख रुपये परस्पर डेबिट झाले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर माहिती दिली. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे ही रक्कम पुण्यातील फिनकॉर्प कंपनीच्या कर्ज खात्यात जमा झाल्याचे शोधून काढले.

उपनिरीक्षक मोबीन शेख यांच्या पथकाने पुणे येथे जाऊन मितेश जालींदर वाघुले, किरण मच्छिंद्र नेहरकर, विजय काशीनाथ व्होरहाडे, दत्तात्रय गंगाराम गवारी आणि गंधार संजय रत्नपारखी या संशयितांना निष्पन्न केले. कमिशनच्या मोबदल्यात इतरांच्या नावावर कर्ज खाती वापरून सायबर गुन्हे केले जात असल्याचे तपासात उघड झाले असून, पोलिसांनी तत्परता दाखवत ३ लाख रुपये ॲड. खलिफे यांच्या खात्यात पुन्हा जमा केले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक मोबीन शेख, पोलीस कर्मचारी दिनेश आखाडे, दिगंबर शेलार आणि दीपक काळे यांनी ही कामगिरी केली. दरम्यान, नागरिकांनी अनोळखी लिंक किंवा एपीके फाईल्स उघडू नयेत आणि कोणत्याही परिस्थितीत बँक खात्याची गोपनीय माहिती किंवा ओटीपी शेअर करू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *