गणपतीपुळे येथे स्वच्छता मोहिमेतून प्लास्टिकचा विळखा दूर; ४२ बॅग कचऱ्याचे संकलन

Gramin Varta
259 Views

रत्नागिरी : प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत आरोग्य उपकेंद्र गणपतीपुळे यांच्या वतीने गणपतीपुळे परिसरात नुकतीच एक व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्लास्टिक आणि इतर कचऱ्याच्या तब्बल ४२ बॅग संकलित करण्यात आल्या असून, पर्यटन क्षेत्रातील स्वच्छतेसाठी एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला आहे.
आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या मोहिमेचे उद्घाटन पोलीस अधिकारी गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात आरोग्य निरीक्षक राजेंद्र रणसे, सीएचओ मनाली तारवे, आरोग्य सेवक विक्रम जाधव, आरोग्य सेविका अश्विनी गोवळकर, आशा सेविका, ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून एमटीडीसी गेट ते कपिल लॉज या मार्गावरील संपूर्ण परिसर कचरामुक्त करण्यात आला.
यावेळी मोहिमेत सहभागी झालेल्यांनी “स्वच्छ गणपतीपुळे – सुंदर गणपतीपुळे” हा संदेश देत पर्यटकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळेचा परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक राखण्यासाठी नागरिकांनी कचरा सार्वजनिक ठिकाणी न फेकता त्याची योग्य ठिकाणीच विल्हेवाट लावावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार आणि डॉ. ऋषिकेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. गणपतीपुळेचा परिसर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *