राऊत कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धक्कादायक माहिती : राजापूरचा काझी बाबा, कुडाळचा भगत आणि सावंतवाडीचा फिरोज बाबाने केले असे किळसवाणे कृत्य

Gramin Varta
442 Views

जादूटोणा, अंगारे-धुपारे, गोमूत्र पाजणे, केस उपटल्याचे सुनेचे गंभीर आरोप

राजापूर : माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने दाखल केलेल्या तक्रारीत राजापूर, सावंतवाडी आणि सिंधुदुर्गातील काही भगत व तथाकथित बाबांमार्फत जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली अत्यंत धक्कादायक प्रकार करण्यात आल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तक्रारीतील तपशील समोर आल्यानंतर या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

तक्रारीनुसार, सावंतवाडी (कोलगाव) येथील फिरोज बाबा याने तक्रारदार महिलेच्या डोक्यावर पाणी शिंपडले, लिंबू कापून शांत बसण्यास सांगितले आणि विविध धार्मिक विधी केल्याचा आरोप आहे. तसेच राजापूर कारुळ घाटातील काझी बाबा यानेही भगतगिरी करत विविध अंधश्रद्धाजन्य उपाय केल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय, हरिश्चंद्र घाडी (नानेली, कुडाळ, सिंधुदुर्ग) या भगताने सप्टेंबर २०१८ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत जादूटोण्याच्या नावाखाली काळ्या कणकेच्या बाहुल्या तयार करणे, लिंबू, टाचण्या, अंगारे-धुपारे, कच्च्या माशांचे तुकडे वापरणे, जिवंत कोंबडा आणणे, डोक्यावरील केस उपटणे, गोमूत्र पिण्यास देणे तसेच इतर अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारदार महिलेने पुढे म्हटले आहे की, वैद्यकीय उपचार सुरू असतानाही ते बंद करून वारंवार अशा भगत आणि बाबांकडे नेण्यात आले. अंगारे-धुपारे, मंत्रतंत्र, जादूटोणा आणि विविध कथित धार्मिक विधी करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. या प्रकारांना विरोध केल्यास शिवीगाळ, दमदाटी आणि मानसिक छळ करण्यात आल्याचाही आरोप तिने केला आहे.

या तक्रारीत माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह कुटुंबातील काही सदस्यांविरोधातही विविध आरोप करण्यात आले आहेत. मात्र, हे सर्व आरोप तक्रारदार महिलेने केलेले असून ते अद्याप न्यायालयात किंवा तपासात सिद्ध झालेले नाहीत. संबंधित व्यक्तींची बाजू अद्याप समोर आलेली नाही.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *