इंग्लंडच्या मैदानावर रत्नागिरीच्या सुपुत्राची चमक; रोहित शर्माला केली गोलंदाजी

Gramin Varta
69 Views

रत्नागिरी: क्रिकेटच्या मैदानात मोठे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूसाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांना भेटणे हे एक स्वप्न असते. मात्र, रत्नागिरीचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने हे स्वप्न केवळ सत्यात उतरवले नाही, तर खुद्द ‘हिटमॅन’ रोहित शर्माला सलग पाच षटके गोलंदाजी करत त्याचे कौतुकही मिळवले आहे.

अविराज सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत असून, तिथेच भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याच्या तयारीसाठी रोहित शर्मा मिडलसेक्स कौंटीच्या मैदानावर येणार असल्याची माहिती त्याला मिळाली. ही संधी साधत अविराजने विंबल्डन क्लबचे चेअरमन सोहम यांच्या मदतीने रोहित शर्माला गोलंदाजी करण्याचा थरार अनुभवला. सरावाच्या वेळी सुरुवातीला काहीसा दडपणाखाली असलेल्या अविराजला रोहितने धीर दिला. त्यानंतर अविराजने टाकलेल्या लेगस्पिन गोलंदाजीच्या माऱ्यापुढे रोहित शर्मालाही त्रिफळाचीत व्हावे लागले. बाद झाल्यावर रोहितने मिश्किलपणे, “आता यानंतर मी पुन्हा बाद होणार नाही,” असे म्हणत खेळाचा आनंद घेतला.

यानंतर अविराजने आपली अचूक गोलंदाजी कायम राखली, ज्याचे रोहितने विशेष कौतुक केले. सरावानंतर रोहित आणि अविराज यांच्यात संवाद झाला. अविराज महाराष्ट्राचा असल्याचे समजताच रोहितने त्याच्याशी थेट मराठीतून संवाद साधत त्याला यशाचा कानमंत्र दिला. “फक्त चांगली लाइन-लेंथ टाकणे पुरेसे नाही. भारतात लाखो क्रिकेटपटू आहेत, गर्दीतून वेगळे दिसण्यासाठी तुमची कामगिरीच बोलली पाहिजे. मेहनतीला कोणताही पर्याय नाही, फक्त सातत्य ठेवा,” असे मोलाचे मार्गदर्शन रोहितने केले. अविराजला आपल्या वडिलांशी रोहितने फोनवर बोलावे अशी इच्छा होती, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे संपर्क होऊ शकला नाही. तरीही, रोहितने दाखवलेला नम्रपणा अविराजच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. रोहित शर्मासारख्या महान खेळाडूने खांद्यावर हात ठेवून दिलेले मार्गदर्शन ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असल्याचे सांगत अविराज गावडेने आपल्या कामगिरीने संपूर्ण कोकणचे नाव उंचावले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *