खेडशी राधाईनगर परिसरात पहाटेच बिबट्याचे दर्शन; भीतीचे सावट

Gramin Varta
262 Views

रत्नागिरी : खेडशी येथील चिंचवटीमधील राधाईनगर परिसरात शुक्रवारी पहाटे बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या रस्त्यालगत फिरताना काही नागरिकांच्या नजरेस पडला. उपस्थितांनी त्याचे चित्रीकरण केले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ज्या मार्गावर बिबट्या दिसला, त्या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले, महिला आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अनेक नागरिकांना रात्री-अपरात्रीही या रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. रस्त्याचे काम कधी पूर्ण होईल हा वेगळा विषय असला, तरी सध्या या मार्गावरील पथदिवे सुरू करणे अत्यंत गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अंधारामुळे बिबट्याचा वावर लक्षात येत नसल्याने धोका अधिक वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.वन विभागाने परिसरात तातडीने पाहणी करून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, तसेच ग्रामपंचायतीने रस्त्यावरील दिव्यांची व्यवस्था त्वरित करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी एकटे प्रवास टाळावा आणि सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *