मिशन ग्रामसुरक्षेला नागरिकांचा हातभार; लांजा बस स्थानकासाठी सौरभ कवचे यांच्याकडून दोन सीसीटीव्ही कॅमेरे भेट

Gramin Varta
341 Views

पोलिस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या हस्ते सौरभ कवचे यांचा सत्कार

लांजा/ अरबाज नेवरेकर : लांजा बस स्थानक परिसरात घडणाऱ्या चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या ‘मिशन ग्रामसुरक्षा’ उपक्रमांतर्गत नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लांजा आगरवाडी येथील सौरभ कवचे यांनी लांजा बस स्थानक परिसरासाठी दोन सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले.

सदर कॅमेरे बस स्थानक परिसरात बसविण्यात आले असून, त्यामुळे परिसरातील हालचालींवर प्रभावी नजर ठेवणे शक्य होणार आहे. चोरीसह इतर गुन्हे रोखण्यासाठी तसेच तपासकार्याला मदत होण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या सामाजिक योगदानाबद्दल लांजा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलकंठ बगळे यांनी सौरभ कवचे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. नागरिकांच्या सहकार्यामुळेच ‘मिशन ग्रामसुरक्षा’ उपक्रम अधिक प्रभावी होणार असून, इतर नागरिक, व्यापारी आणि संस्था यांनीही आपल्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारून सुरक्षिततेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन लांजा पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

पोलीस आणि नागरिक यांच्या सहभागातून परिसर अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, त्याला नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *