आधीचे महामार्ग रखडले, तरी नव्या महामार्गांचा हट्ट कशासाठी?; कोकणवासीयांचा संताप, निकृष्ट कामांवर कारवाईची मागणी

Gramin Varta
176 Views

रत्नागिरी / अजय सावंत : राज्यातील अनेक राष्ट्रीय महामार्गांची कामे वर्षानुवर्षे अपूर्ण असताना नव्या महामार्गांच्या घोषणा आणि मंजुरीच्या हालचाली सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, मिऱ्या-नागपूर महामार्ग आणि इतर महत्त्वाच्या रस्त्यांवरील रखडलेली कामे, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, अपूर्ण सेवा रस्ते, उड्डाणपुलांतील त्रुटी आणि वारंवार समोर येणारे अपघाताचे धोके यामुळे नागरिकांचा संयम संपत चालला आहे. “आधी सुरू असलेले महामार्ग पूर्ण करा, दोषींवर कारवाई करा आणि त्यानंतरच नवीन प्रकल्प जाहीर करा,” अशी ठाम भूमिका कोकणवासीयांनी घेतली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी गेली अनेक वर्षे आंदोलने, निवेदने, पत्रकारांचे सातत्यपूर्ण वृत्तांकन आणि सामाजिक संघटनांचा पाठपुरावा सुरू आहे. तरीही अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही सुरक्षित आणि दर्जेदार महामार्ग नागरिकांना मिळत नसल्याची भावना अधिक तीव्र होत आहे.

लांजा येथील उड्डाणपुलाच्या उतारासाठी करण्यात आलेल्या भरावाच्या गुणवत्तेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लांजा शहरप्रमुख मोहन तोडकरी यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात भरावाच्या दोन्ही बाजूंना बसविण्यात आलेल्या इंटरलॉकिंग प्लेट्स बाहेर येत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील नागोठणे पुलावरील काँक्रीट स्लॅबमध्ये फट वाढल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करून वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवावी लागली. रत्नागिरीतील भोस्ते घाट परिसरात महामार्गावर मोठ्या भेगा पडल्याचे समोर आले असून त्या केवळ तात्पुरत्या डागडुजीने झाकण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.

मंडणगड-बाणकोट राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे रस्त्याखाली मोठे भगदाड पडले, तर नांदेड-लातूर महामार्गावरील विष्णुपुरी उड्डाणपुलाचा काही भाग अचानक कोसळल्याची घटनाही नुकतीच घडली. या घटनांमुळे सार्वजनिक बांधकामांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

अशा परिस्थितीत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी दापोली-पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गास मंजुरी देण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. मात्र, आधीच अपूर्ण असलेल्या महामार्गांवरील त्रुटी दूर न करता नवीन महामार्गांची घोषणा करण्याच्या भूमिकेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कोकणवासीयांचे स्पष्ट म्हणणे आहे की, महामार्गांचे केवळ उद्घाटन किंवा घोषणा करून विकास होत नाही. सुरक्षित, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झालेले रस्तेच खऱ्या अर्थाने विकासाचे प्रतीक असतात. सेवा रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, उड्डाणपूल आणि इतर सुविधा पूर्ण झाल्याशिवाय नवीन प्रकल्पांना प्राधान्य देणे म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोकणवासीयांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने कोकण दौरा करून मुंबई-गोवा आणि मिऱ्या-नागपूर महामार्गांची प्रत्यक्ष पाहणी करावी, कामातील त्रुटींसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी तसेच रखडलेली कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली आहे. “नवीन महामार्गांच्या घोषणा नकोत; आधी अपूर्ण महामार्ग पूर्ण करा,” हा आवाज आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.

Total Visitors :
4576765
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *