संगमेश्वरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक लवकरच पूर्णत्वास; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची पाहणी

Gramin Varta
378 Views

संगमेश्वर : तालुक्यात कसबा येथे उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. बुधवारी संगमेश्वर येथे पोहोचलेल्या मंत्री शेलार यांनी स्मारकाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला. या स्मारकाच्या निर्मितीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि माजी आमदार प्रमोद जठार यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पाहणी दौऱ्यादरम्यान मंत्री शेलार यांनी स्मारकाचा आराखडा आणि त्याचे डिजिटल सादरीकरण अत्यंत बारकाईने तपासले. स्मारकाच्या उभारणीत कोणतीही उणीव राहू नये, यासाठी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चा केली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करून कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक ठरेल असे हे भव्य स्मारक लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्याच्या वेळी माजी आमदार प्रमोद जठार, प्रशांत यादव, राजेंद्र महाडिक, पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये, वैभव खेडेकर आणि डॉ. अमित ताठरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मंत्री आशिष शेलार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. हे स्मारक केवळ एक वास्तू नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा वारसा ठरणार असल्याने शासन स्तरावर याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Total Visitors :
4827222
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *