चवे देवूड येथील जागतिक वारसा असलेल्या कातळशिल्पांची सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली पाहणी

Gramin Varta
477 Views

रत्नागिरी :  तालुक्यातील चवे देवूड येथील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांना (पेट्रोग्लिफ्स) सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज भेट देऊन त्यांची सविस्तर पाहणी केली. या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी आणि जतनासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या दौऱ्यादरम्यान मंत्री शेलार यांच्या हस्ते पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष ‘सोव्हीनियर शॉप’चे (भेटवस्तू केंद्र) उद्घाटनही करण्यात आले.

यावेळी आमदार प्रमोद जठार, आमदार किरण सामंत, प्रशांत यादव, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चवे देवूड येथील १५ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद अशा विस्तीर्ण खडकावर पसरलेली कातळशिल्पे ही मानवी विकासाची साक्ष देणारा एक दुर्मिळ ठेवा आहेत. येथे साठपेक्षा अधिक खोदचित्रे असून, त्यात आक्रमक पवित्रा घेतलेला एकशिंगी गेंडा, झेप घेणारे हरीण, लांब पिसारा असलेला मोर, तरस, माकड आणि मानवी पावलांच्या आकृत्यांसह विविध प्राणी-पक्षांचे जिवंत चित्रण पाहायला मिळते.

या शिल्पसमूहाची बारकाईने पाहणी केल्यानंतर मंत्री शेलार यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी या ऐतिहासिक ठेव्याच्या संवर्धनाबाबत सविस्तर चर्चा केली. ही कातळशिल्पे केवळ पुरातत्वीय दृष्टीनेच नव्हे, तर कलात्मक आणि मानव विज्ञानाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची असून, मानवी विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील जीवनशैलीची ती साक्ष देतात, असे त्यांनी सांगितले. जागतिक वारसा स्थळाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या ठिकाणच्या पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने सोव्हीनियर शॉपचे उद्घाटन करण्यात आले. या भेटीमुळे चवे देवूडमधील कातळशिल्पांच्या जतनासाठी आणि पर्यटनाच्या विकासासाठी नवी दिशा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Total Visitors :
4576519
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *