पाचल: विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे, या उदात्त हेतूने दत्त मंदिर ट्रस्ट, रायपाटणच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा, कोळंब येथील विद्यार्थ्यांना रायटिंग पॅडचे वाटप करण्यात आले. श्री. गुरुदत्त ताम्हणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचा योग्य उपयोग करून नियमित अभ्यास करण्याचे आवाहन केले. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. तेलंग गुरुजी यांनी ट्रस्टच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून ट्रस्टने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असून, भविष्यातही अशाच प्रकारे विद्यार्थीहिताच्या उपक्रमांसाठी सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या सोहळ्याला कोळंब गावचे सरपंच श्री. शाहू पाटेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. योगेश सुतार, मुख्याध्यापक श्री. तेलंग गुरुजी, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी श्री. विश्वनाथ नारायण पाटेकर व श्री. अनिल धनाजी पाटेकर, तसेच ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष जयेशानंदजी बांबरकर महाराज आणि कार्याध्यक्षा सौ. सुमित्रा गजानन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
