संगमेश्वर : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुरळ–सुवरेवाडी या शाळेला उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाच्या बळावर ‘आदर्श शाळा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित समारंभात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. शैक्षणिक उठाव (४६५०००१), तारखेनुसार पाढे पाठांतर, दररोज हजेरीवेळी नवीन इंग्रजी शब्द सांगणे, हस्ताक्षर सुधारण्यासाठी दररोज उतारा लेखन या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली आहे. याशिवाय शिष्यवृत्ती परीक्षेस दोन विद्यार्थ्यांची, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेस एका विद्यार्थ्याची तसेच इस्रो भेटीसाठी एका विद्यार्थ्याची निवड होणे ही शाळेची उल्लेखनीय कामगिरी ठरली.
शाळेची सुसज्ज इमारत, आकर्षक व रचनात्मक परसबाग, परसबागेतील भाजीपाल्याची विक्री आणि त्याचा पोषण आहारात वापर हे उपक्रमही विशेष ठरले. रक्षाबंधन, रानभाज्या प्रदर्शन, आजी-आजोबा दिवस, दहीहंडी, ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमांत पालकांचा उत्स्फूर्त सहभाग, वृक्षारोपण, आषाढी एकादशी दिंडी, बोलक्या भिंती आणि बोलका शालेय परिसर अशा उपक्रमांमुळे शिक्षणाबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचीही प्रभावी जोपासना करण्यात आली.
हा मानाचा पुरस्कार मिळविण्यासाठी सुवरेवाडीतील ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ, श्री गणेश महिला मंडळ, सर्व पालक तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सिताराम सुवरे आणि माजी सरपंच सहदेव सुवरे यांचे विशेष योगदान लाभले. संगमेश्वर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय परीट, शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब बळवंत, माजी केंद्रप्रमुख संतोष कदम, दीपक यादव तसेच केंद्रातील शिक्षक बाबासाहेब सानप, सारिका सानप, चंद्रकांत बाटे व इतर शिक्षकांचेही मार्गदर्शन शाळेला लाभले.
मुख्याध्यापक आबासाहेब लवटे आणि सहाय्यक शिक्षक कांचन बसवत यांच्या अथक परिश्रमांमुळे शाळेला हा बहुमान प्राप्त झाला. विशेष म्हणजे, लवटे यांनी यापूर्वी कार्यरत असलेल्या जि. प. शाळा शिंदे आंबेरीलाही ‘आदर्श शाळा’ पुरस्कार मिळाला होता. तसेच कडवई कुंभारवाडी शाळेला पित्रे फाउंडेशन, देवरुख यांच्या परिसर विकास प्रकल्पांतर्गत संगमेश्वर तालुक्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गौरी प्रतिष्ठान, देवरुख यांच्या वतीने त्यांना ‘आदर्श शाळा व उपक्रमशील शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या कार्यात अंगणवाडी सेविका स्मिता विचारे आणि मदतनीस गीतांजली सुवरे यांचेही सहकार्य लाभले.
