शंभर वर्षांची परंपरा आणि ५० कोटींची उलाढाल असलेल्या प्रसिद्ध लोणावळा चिक्कीला मिळाले जीआय टॅग

Gramin Varta
95 Views

नवी मुंबई: शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या आणि ५० कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या लोणावळ्याच्या चिक्कीला भौगोलिक नामांकन म्हणजेच जीआय टॅग मिळाला असून, यासाठी गेल्या चार वर्षांपासून येथील नॅशनल चिक्कीचे मालक व्यापारी अभय पारख यांचे प्रयत्न सुरू होते. या मानामुळे चिक्कीच्या परदेशात होणाऱ्या निर्यातीला मोठी चालना मिळेल, अशी माहिती मगनलाल चिक्कीचे मालक मंगेश अग्रवाल यांनी बोलताना दिली असून, लोणावळा चिक्कीला जीआय टॅग मिळाल्याने चिक्की उत्पादक आणि व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

चिक्की उद्योगाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवी संधी उपलब्ध होणार असल्याने व्यावसायिकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. आजमितीस लोणावळ्यात चिक्की व्यावसायिकांची चौथी ते सहावी पिढी हा व्यवसाय आणि उद्योग सांभाळत असून, या व्यवसायात राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि स्थानिक उद्योजक कार्यरत आहेत तसेच सुमारे २१ प्रकारची चिक्की हे उद्योग तयार करतात आणि त्यामध्ये क्रश शेंगदाणे चिक्कीला सर्वाधिक ग्राहकांकडून मागणी असल्याचे मंगेश अग्रवाल यांनी सांगितले. लोणावळा चिक्कीचा इतिहास ब्रिटिशकालीन रेल्वे बांधकामाशी जोडलेला असून, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला कर्जत ते खंडाळा दरम्यान रेल्वे बोगदे खोदण्याचे आणि रेल्वे मार्ग उभारण्याचे काम सुरू असताना त्या काळात हजारो मजूर या कामावर कार्यरत होते. त्यांच्या भुकेची सोय करण्यासाठी आणि दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळावी म्हणून गूळ, शेंगदाणे आणि मुरमुरे यांचे मिश्रण करून गूळदाणी तयार करण्यात आली होती आणि स्वस्त, पौष्टिक व चविष्ट असल्यामुळे ही गूळदाणी मजुरांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली. त्यानंतर रेल्वे कामाच्या पाहणीसाठी येणाऱ्या ब्रिटिश अधिकारी आणि अभियंत्यांनाही तिची चव आवडली आणि त्यांच्या माध्यमातून या गोड पदार्थाची ख्याती दूरवर पोहोचली, पुढे रेल्वे स्थानकांवर पॅकबंद स्वरूपात तिची विक्री सुरू झाली आणि कालांतराने हीच गूळदाणी लोणावळा चिक्की म्हणून देशभर प्रसिद्ध झाली.

सध्या बाजारात शेंगदाणे क्रश, खोबरा, काजू, ड्रायफ्रुट, काजू क्रश, तिळ, चणा चिक्की, केशर काजू आणि केशर बदाम फिस्ता चिक्की विकली जाते, ज्यामध्ये प्रामुख्याने क्रश शेंगदाणे ४८० रुपये, काजू चिक्की १६०० रुपये, खोबरे चिक्की ४८० रुपये, ड्रायफ्रुट चिक्की १७०० रुपये, काजू क्रश १६०० रुपये आणि केशर बदाम पिस्ता चिक्की १८०० रुपये प्रति किलो या दराने विकली जाते. सध्या निर्यात केवळ १ ते २ टक्के एवढीच परदेशात होत असून युएस, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये ती सुरू आहे, मात्र जीआय टॅगमुळे परदेशातील निर्यात १० टक्क्यांपर्यंत वाढणार असून त्याचा उद्योजकांना मोठा फायदा होईल, असा विश्वास मंगेश अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

Total Visitors :
4565620
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *