संगमेश्वर : फेसबुकवरील बनावट क्रेडिट कार्ड जाहिरातीच्या आमिषाने वृद्धाची १ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक

Gramin Varta
135 Views

देवरूख : बँक ऑफ महाराष्ट्रच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड योजनेची बनावट जाहिरात दाखवून एका ७६ वर्षीय वृद्धाची तब्बल १ लाख ५३ हजार ४५९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण येथे घडली आहे. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विलास नारायण कोळपे (वय ७६, रा. कासार कोळवण-कासारवाडी, ता. संगमेश्वर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ८ जुलै २०२६ रोजी रात्री साडेआठ ते ९ वाजण्याच्या सुमारास तसेच ९ जुलै रोजी पहाटे ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादी हे घरी असताना त्यांच्या मोबाईलवर फेसबुक अॅप पाहत होते. त्यावेळी त्यांना बँक ऑफ महाराष्ट्रमधील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड योजनेची जाहिरात दिसली. या जाहिरातीखालील साईनअप टॅबवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने आपण महाराष्ट्र बँकेतून बोलत असल्याचे सांगत हिंदी भाषेत संवाद साधला.

यानंतर आरोपीने फिर्यादींकडून डेबिट कार्डचा १६ अंकी क्रमांक मागून घेतला. त्यानंतर व्हॉट्सअॅप कॉलचे व्हिडीओ कॉलमध्ये रूपांतर करून फिर्यादींचा चेहरा स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने मोबाईल धरण्यास सांगितले. या प्रक्रियेदरम्यान मिळालेल्या माहितीचा गैरवापर करून आरोपीने फिर्यादींच्या पेन्शन खात्यातून ऑनलाइन पद्धतीने १ लाख ५३ हजार ४५९ रुपये काढून घेतले.

या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (क) आणि ६६ (ड) अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :
4572186
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *