देवरुखात पिण्याच्या पाण्यालगत कचऱ्याचे ढीग; नगरपंचायतीच्या कारभारावर संताप

Gramin Varta
92 Views

आठ कोटींचे डम्पिंग ग्राऊंड धूळ खात; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

देवरुख : देवरुख शहरातील नागरिकांना पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या जलशुद्धीकरण केंद्रालगतच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार नगरपंचायतीच्या मासिक सभेत उघड झाला. जनतेच्या कराच्या पैशातून तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले डम्पिंग ग्राऊंड वापरण्याऐवजी जलशुद्धीकरण केंद्राशेजारीच कचऱ्याचे ढिगारे साचत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप करत उबाठा गटाचे नगरसेवक बाळा कामेरकर आणि मनसेचे नगरसेवक अनुराग कोचिरकर यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

सभागृहात कचऱ्याची प्रत्यक्ष छायाचित्रे सादर करत नगरसेवकांनी प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराची पोलखोल केली. जलशुद्धीकरण केंद्रालगत पडलेल्या कचऱ्यावर घिरट्या घालणारे पक्षी आणि घारी तो कचरा पाण्याच्या टाक्यांच्या परिसरात टाकत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकारामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करत नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणीही करण्यात आली.

बाळा कामेरकर यांनी, “आठ कोटी रुपये खर्च करून डम्पिंग ग्राऊंड उभारले, मग तो वापरात का नाही? जलशुद्धीकरण केंद्राजवळ कचरा टाकण्यामागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. अनुराग कोचिरकर यांनीही प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर जोरदार टीका करत जलशुद्धीकरण केंद्रालगतचा सर्व कचरा तात्काळ हटविण्याची मागणी लावून धरली.

सभागृहातील तीव्र आक्रमक चर्चेनंतर प्रशासनाने अखेर माघार घेत येत्या एका महिन्याच्या आत जलशुद्धीकरण केंद्रालगतचा सर्व कचरा हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात येईल, असे अधिकृत आश्वासन दिले.

या सभेला नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्यासह नगरसेवक बाळा कामेरकर, अनुराग कोचिरकर, निधा कापडी, सिद्धेश वेल्हाळ, अक्षय झेपले, सागर संसारे आणि रितिका कदम उपस्थित होते. सभेत सात नगरसेवकांनी एकत्रितपणे हा गंभीर प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला.

Total Visitors :
4585175
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *