भारतीय मानवाधिकार असोसिएशनचे जिल्हा सह-सचिव तसवर खान यांच्या पाठपुराव्याला यश
रत्नागिरी : रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना औषधे खरेदी करताना अधिक पर्याय उपलब्ध व्हावेत आणि त्यांच्यावर अनावश्यक आर्थिक भार पडू नये, यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) परिपत्रकानुसार रुग्णांना त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही अधिकृत औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करण्याचा अधिकार असल्याची सूचना जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांना देण्यात आली आहे.
या संदर्भात भारतीय मानवाधिकार असोसिएशन (नवी दिल्ली)चे जिल्हा सह-सचिव (पोलिस संरक्षण) तसवर खान यांनी १७ जून २०२६ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे निवेदन सादर करून रुग्णांच्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप यांनी आवश्यक सूचना जारी केल्या.
सूचनांनुसार कोणत्याही रुग्णालयाला रुग्णांना केवळ स्वतःच्या औषधालयातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. रुग्णांना बाहेरील कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य राहील. तसेच या हक्काची माहिती देणारा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले असून, सर्व खासगी रुग्णालयांनी फलक लावल्याचे छायाचित्रांसह पालन अहवाल संबंधित कार्यालयात सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून औषध खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
भारतीय मानवाधिकार असोसिएशनच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप यांनी निवेदनाची तातडीने दखल घेऊन आदेश जारी केल्याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त करण्यात आले आहेत.
रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्याचा अधिकार; जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना सूचना
Leave a Comment





