अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात चिपळूणमध्ये रिपाइंचे आंदोलन

Gramin Varta
55 Views

चिपळूण : अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चिपळूण तालुक्याच्या वतीने शुक्रवारी प्रांत कार्यालयावर निवेदन देत शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून चिपळूण येथे हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी आकाश लिगांडे यांना निवेदन सादर केले. त्यानंतर प्रांत कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी “आरक्षण वाचवा”, “उपवर्गीकरण रद्द करा” अशा घोषणा देत शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. अनुसूचित जाती आरक्षण हे भारतीय संविधानाने दिलेले घटनात्मक संरक्षण असून, त्याचे उपवर्गीकरण करून आरक्षण कमकुवत करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

या आंदोलनात रिपाइंचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ, कोकण प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. उमेश पवार, युवक जिल्हाध्यक्ष ॲड. प्रशितोष कदम, शहराध्यक्ष मंगेश जाधव, शहर सरचिटणीस अमोल कदम, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत सावंत, सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष संजय गमरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते यांनी बाबासाहेबांनी दिलेले आरक्षण कोणत्याही परिस्थितीत टिकले पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली. उपवर्गीकरणामुळे दलित समाजात फूट निर्माण होण्याची शक्यता असून शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. निळे झेंडे, निळ्या टोप्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसह कार्यकर्त्यांनी आंदोलनातून एकजुटीचा संदेश दिला. हे आंदोलन पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडले.

Total Visitors :
4585027
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *