दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेला संसार काळाच्या घावाने उद्ध्वस्त; नवविवाहित दाम्पत्याचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत

Gramin Varta
377 Views

नाशिक : अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्यावर घडली. भरधाव मॅक्स वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दिनेश गावित आणि त्यांच्या पत्नी कीर्ती गावित यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने गावित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश गावित, त्यांच्या पत्नी कीर्ती गावित आणि त्रिशा गावित हे तिघे दुचाकीवरून नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात होते. त्यावेळी कळवणच्या पिळकोस फाट्यावर भरधाव मॅक्स वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

मात्र उपचार सुरू असतानाच दिनेश आणि कीर्ती या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात त्रिशा गावित गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वी नव्या संसाराची सुरुवात केलेल्या दाम्पत्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने नातेवाईक आणि परिचितांवर शोककळा पसरली आहे.

दिनेश आणि कीर्ती यांचा विवाह याच वर्षी मे महिन्यात झाला होता. संसाराची स्वप्ने पाहत असतानाच अवघ्या दोन महिन्यांत नियतीने त्यांच्यावर घाला घातला. कीर्ती गावित अभोणा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, तर दिनेश गावित जलसंपदा विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या या दाम्पत्यावरच काळाने अंत्यविधीची वेळ आणल्याने गावित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नव्या संसाराची चाहूल लागण्याआधीच काळाने त्यांचा संसार हिरावून घेतल्याने कळवण परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4590888
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *