संगमेश्वर शहरात चोरांचा सुळसुळाट; किराणा दुकानातून सत्तर हजारांचा माल लांबवला

Gramin Varta
417 Views

संगमेश्वर: संगमेश्वर शहरात चोरीची एक मोठी घटना उघडकीस आली असून, येथील रफीक मार्ट किराणा दुकानात अज्ञात चोरट्याने डल्ला मारत सुमारे साठ हजार रुपयांचा किराणामाल लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना २५ जुलै २०२६ रोजी रात्री दहा वाजता ते २६ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी मुमताज रफिक मेमन (वय ४६, रा. कसबा उभा मोहल्ला, ता. संगमेश्वर) यांच्या दुकानात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने दुकानातील ६० हजार ३४० रुपयांचा किराणामाल स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेला.

चोरीला गेलेल्या मालामध्ये चार हजार रुपये किमतीची ५० किलो वजनाची साखरेची दोन पोती, सोळा हजार रुपये किमतीची ३५ किलो वजनाची मिरचीची दोन पोती, सहा हजार रुपये किमतीची ३० किलो वजनाची जिऱ्याची एक बॅग, दहा हजार दोनशे रुपये किमतीचे जेमिनी सनफ्लॉवर तेलाचे पाच बॉक्स, आठ हजार आठशे रुपये किमतीच्या राजा सोया तेलाच्या चार बरण्या, सात हजार सातशे चाळीस रुपये किमतीच्या जेमिनी सनफ्लॉवर तेलाच्या तीन बरण्या तसेच सात हजार सहाशे रुपयांचा इतर किराणामाल असा एकूण ६० हजार ३४० रुपयांचा माल चोरीला गेला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, अज्ञात चोराचा शोध संगमेश्वर पोलिसांकडून घेतला जात आहे.

Total Visitors :
4841425
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *