वेतोशी फाट्यावर तीन बैलांची निर्दयी वाहतूक; बोलेरोसह ५.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
420 Views

रत्नागिरी : पशुवैद्यकीय तपासणी न करता तसेच पाणी व खाद्य न देता तीन गावठी बैलांना वाहनात दाटीवाटीने आणि वेदना व यातना होतील अशा पद्धतीने बांधून वाहतूक केल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २७ जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास वेतोशी फाटा येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश रामदास कडू (वय ३४, रा. देवरुख माळवाशी, ता. संगमेश्वर) आणि योगेश गजानन म्हादे (वय ३४, रा. पांगरी मोठीवाडी, ता. संगमेश्वर) हे दोघे बोलेरो पिकअप टेम्पो क्रमांक एमएच ०८ डब्ल्यू ३३८५ मधून तीन गावठी बैलांची वाहतूक करताना आढळून आले. वाहतुकीचा आवश्यक परवाना नसताना बैलांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून न घेता, त्यांना पाणी अथवा खाद्य न देता आणि दोरीने बांधून त्रासदायक पद्धतीने वाहतूक केल्याचा आरोप आहे.

या कारवाईत पोलिसांनी एकूण ५ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ५ लाख रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पो तसेच अंदाजे १३ हजार, ८ हजार आणि १० हजार रुपये किमतीचे तीन गावठी बैलांचा समावेश आहे.

या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मण शांताराम रांबाडे (वय ४८, रा. वेतोशी वरचीवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांच्या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(अ), (ड), (ई), (फ), (एच) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Total Visitors :
4595375
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *