चिपळुणात भरदिवसा घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड मिळून ८.१८ लाखांचा ऐवज लंपास

Gramin Varta
414 Views

चिपळूण : चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरातील अल नजु अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल ८ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ३० जुलै रोजी दुपारी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नगमा अबीदअली मुजावर (वय ४०, रा. गोवळकोट रोड, चिपळूण) या ३० जुलै रोजी दुपारी १२.३० ते १.४० वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर गेल्या होत्या. याच कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा हत्याराच्या साहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे अडीच तोळे वजनाचे तीन सरींचे सोन्याचे मंगळसूत्र, एक तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, एकूण तीन तोळे वजनाच्या पाच सोन्याच्या चेन, एक तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, दोन तोळे वजनाच्या चार जोड सोन्याच्या कर्णफुल्या आणि सुमारे चार तोळे वजनाच्या दहा सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश आहे. याशिवाय ८ हजार रुपयांची रोख रक्कमही चोरीस गेली आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत सुमारे ८ लाख १८ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, याच सुमारास चिपळूणमधील द्वारका कृष्णकुंज बिल्डिंग, बायपास रोड परिसरातील धनश्री भोसले यांच्या राहत्या घरीही चोरी झाल्याची माहिती फिर्यादीला मिळाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२१/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५(अ) व ३३१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Total Visitors :
4610035
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *