ग्रामीण वार्ताच्या इशाऱ्यानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम
सावर्डे/विनायक सावंत : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील आरती स्वीटसमोरील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक खड्ड्याबाबत काही दिवसांपूर्वीच ग्रामीण वार्ताने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून हा खड्डा अपघातांना निमंत्रण देत असल्याचा इशारा दिला होता. मात्र, संबंधित यंत्रणांनी त्याची दखल न घेतल्याने शनिवारी पुन्हा याच खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वार महिलेचा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ॲक्टिव्हा दुचाकीवरून चिपळूणच्या दिशेने जात असताना आरती स्वीटसमोरील मोठ्या खड्ड्यात गाडी आदळली. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर पडल्या. या अपघातात त्यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली असून स्थानिकांनी तातडीने मदत केली.
सावर्डे परिसरातील हा खड्डा गेल्या अनेक दिवसांपासून वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. काँक्रीट रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने तो वाहनचालकांच्या नजरेस पडत नाही. परिणामी दुचाकीस्वार वारंवार अपघातग्रस्त होत असून अनेक चारचाकी वाहनांचे टायरही फुटल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. काही दिवसापूर्वीच हा खड्डा बुजवला होता मात्र त्यावरील डांबरही उडून गेल्याने पुन्हा खड्डा पडला. काल याच ठिकाणी एक अपघात झाला होता. आज शनिवारीही तिथेच अपघात झाल्याने वाहन चालकात भीती निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी तसेच पंचायत समितीच्या मासिक बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रश्न अनेकदा आणून दिला आहे. मात्र, अद्यापही कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा हा बेजबाबदारपणा असून अशा निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
वारंवार अपघात होऊनही प्रशासन आणि ठेकेदारांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने हा खड्डा आता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. आणखी एखादा गंभीर अपघात होण्यापूर्वीच या ठिकाणची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, तसेच निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
सावर्डेतील खड्डा ठरला पुन्हा अपघाताचे कारण; दुचाकीस्वार महिला आदळून जखमी
Leave a Comment





