चिपळूण रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण; खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे प्रवासी व वाहनचालक त्रस्त

Gramin Varta
37 Views

चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असलेल्या चिपळूण रेल्वे स्थानकाकडे शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवासी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.

चिपळूण रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र स्थानकाकडे जाणारा हा प्रमुख संपर्कमार्ग खड्डेमय झाल्याने रिक्षाचालक, खासगी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रेल्वे स्थानक हे शहराचे प्रवेशद्वार मानले जात असताना या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणेकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, जलनि:स्सारणाची व्यवस्था सुधारावी आणि प्रवासी व वाहनचालकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Total Visitors :
4590859
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *