शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मान निधीचे एकाचवेळी ₹४,००० जमा होणार? जाणून घ्या अपडेट!

Gramin Varta
249 Views

मुंबई: राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोडी समोर येत असून, ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारकडून या हप्त्याची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी येत्या १५ ऑगस्ट किंवा रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर काही माध्यमांमध्ये आठवा आणि नववा हप्ता एकत्र जमा होऊन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकाचवेळी ₹४,००० जमा होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत जून महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० चा हप्ता जमा करण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा आठवा हप्ता अद्याप वितरित झालेला नाही. साधारणपणे पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसांत राज्य सरकारकडूनही नमो शेतकरी योजनेचा निधी वितरित केला जातो. मात्र, यावेळी विविध कल्याणकारी योजनांवरील आर्थिक भार आणि निधीच्या उपलब्धतेमुळे या हप्त्याला विलंब झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून योजनेच्या पुढील हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, स्वातंत्र्यदिन किंवा रक्षाबंधनासारख्या महत्त्वाच्या दिवशी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निधी वितरित करण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच आठवा आणि त्यानंतरचा नववा हप्ता एकत्र देण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दरवर्षी ₹६,००० आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी ₹२,००० च्या तीन हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाते. त्यामुळे पुढील हप्त्याची राज्यभरातील लाखो शेतकरी आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

दरम्यान, लाभार्थ्यांनी आपल्या खात्यात हप्ता जमा झाला आहे की नाही, याची माहिती ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून लॉगिन करून तपासता येऊ शकते.

Total Visitors :
4630053
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *