रत्नागिरी विभाग नियंत्रकांकडून सांगली विभागाला पत्र
रत्नागिरी : दाभोळे येथील प्रवाशांना नियोजित बसथांब्यावर न उतरवता बायपास मार्गावर सोडून बस पुढे नेल्याप्रकरणी प्रसिद्ध झालेल्या ‘ग्रामीण वार्ता’च्या वृत्ताची अखेर राज्य परिवहन प्रशासनाने दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित चालक-वाहकाविरोधात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यासाठी रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी सांगली विभाग नियंत्रकांकडे तक्रार वर्ग केली आहे.
दि. १ ऑगस्ट रोजी जत ते रत्नागिरी मार्गावरील एसटी बस दाभोळे बसथांब्यावर न जाता थेट बायपास मार्गाने गेल्याची प्रवाशांची तक्रार प्राप्त झाली होती. यामुळे दाभोळे येथे उतरणाऱ्या प्रवाशांना महामार्गावर उतरावे लागले असून त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. या घटनेबाबत ‘ग्रामीण वार्ता’ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
सदर फेरी जत आगारामार्फत चालवली जात असल्याने रत्नागिरी परिवहन विभागाने ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी सांगली विभाग नियंत्रकांकडे पाठवली आहे. संबंधित चालक-वाहकाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
याशिवाय, जत आगाराच्या रत्नागिरी मार्गावरील सर्व फेऱ्या दाभोळे बसथांब्यावर नियमितपणे थांबवून तेथील प्रवाशांची चढ-उतार करण्यात यावी, तसेच बायपास मार्गाचा वापर टाळावा, अशा सूचनाही संबंधित आगार आणि चालकांना देण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे. तक्रारीसोबत १ ऑगस्ट २०२६ रोजीचे बसचे तिकीट पुरावा म्हणून जोडण्यात आले असून, या प्रकरणात पुढील कारवाईकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
ग्रामीण वार्ताच्या वृत्ताची दखल; दाभोळे येथे रस्त्यात प्रवाशांना उतरणाऱ्या चालक- वाहकाविरोधात चौकशीचे आदेश
Leave a Comment





