रत्नागिरी : जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननात पारदर्शकता वाढविण्यासोबतच अनियमित उत्खननावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी महसूल प्रशासनाने आधुनिक ‘ईटीएस’ (Electronic Total Station) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जिल्ह्यातील ४७ गौण खनिज खाणपट्ट्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या अत्याधुनिक मोजणी मोहिमेत संबंधित खाणपट्ट्यांमध्ये एकूण ७ लाख ६७ हजार ९१५.३५ ब्रास इतके गौण खनिज आढळून आले असून, त्याच्या आधारे शासनाच्या महसुलात मोठी भर पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या सर्वेक्षणाच्या आधारे नियमांचे उल्लंघन झालेल्या खाणपट्ट्यांवर ४ कोटी ५१ लाख ३० हजार ९०० रुपयांची भरणायोग्य रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ही रक्कम शासनाच्या महसुलात जमा होणार असून, अनियमित उत्खननामुळे होणारे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
महसूल प्रशासनाने ईटीएस तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक खाणपट्ट्याचे अचूक क्षेत्रफळ, उत्खननाची खोली आणि प्रत्यक्ष उपसा झालेल्या खनिजाचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यामुळे उत्खननाची वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध झाली असून, मंजूर मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन झाल्याचे आढळल्यास संबंधित परवानाधारकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अतिरिक्त उत्खनन झाल्यास त्याची भरपाईही संबंधितांकडून वसूल केली जाणार आहे.
प्रशासनाच्या मते, या मोहिमेमुळे गौण खनिज क्षेत्रातील अनियमितता, महसूल बुडविण्याचे प्रकार आणि बेकायदेशीर उत्खननाला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार आहे. भविष्यातही ईटीएस तंत्रज्ञानाद्वारे अशाच पद्धतीने नियमित मोजणी आणि तपासणी मोहीम राबवून खाणपट्ट्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील गौण खनिज उत्खनन व्यवस्थेत अधिक पारदर्शकता निर्माण होण्याबरोबरच शासनाच्या महसुलातही लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास महसूल प्रशासनाने व्यक्त केला आहे.
रत्नागिरीत गौण खनिज माफियांना प्रशासनाचा दणका; ४७ खाणपट्ट्यांचे ‘ईटीएस’ ऑडिट, ४.५१ कोटींची वसुली निश्चित
Leave a Comment





