‘कलगी-तुरा समाज उन्नती मंडळा’च्या शिष्टमंडळाची मंत्री गोगावलेंशी भेट
‘कलगी-तुरा वंशावळी’ ग्रंथासाठी शासकीय अर्थसहाय्याची मागणी; मंडळाच्या ६५ वर्षांच्या कार्याचा मंत्र्यांकडून गौरव
मुंबई/ उदय दणदणे: कोकणातील समृद्ध लोककला परंपरेचे संवर्धन करणाऱ्या ‘कलगी तुरा समाज उन्नती मंडळ, मुंबई’च्या कार्यकारिणीने महाराष्ट्राचे रोजगार हमी, फलोत्पादन व खार जमीन विकास मंत्री भरत गोगावले यांची नरिमन पॉईंट येथील ‘सुरूची’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी लोककलावंतांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, तसेच मंडळाच्या वतीने मंत्री महोदयांना निवेदन सुपूर्द करण्यात आले.
गेल्या ६५ वर्षांपासून कोकणातील पारंपरिक कलगी-तुरा (जाखडी) लोककला आणि गुरू-शिष्य परंपरेच्या संवर्धनाचे कार्य हे मंडळ अत्यंत निष्ठापूर्वक करत आहे. भेटीदरम्यान मंडळाच्या वतीने लोककला जतन, गुरू-शिष्य परंपरा टिकवणे आणि सामाजिक उन्नतीसाठी गेल्या वर्षभरात राबवलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा मांडण्यात आला. मंडळाच्या या प्रदीर्घ आणि निरंतर योगदानाची दखल घेत मंत्री भरत गोगावले यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकारिणीचे मनःपूर्वक कौतुक केले.
पहिल्या आवृत्तीच्या अभूतपूर्व यशानंतर ‘कलगी-तुरा वंशावळी’ ग्रंथाची द्वितीय आवृत्ती अधिक समृद्ध आणि संशोधनात्मक स्वरूपात प्रकाशित करण्याचे मंडळाने योजले आहे. या ग्रंथाच्या संशोधन, संपादन व मुद्रणासाठी आवश्यक तो शासकीय निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यासोबतच कोकणातील लोककलेच्या संवर्धनासाठी स्वतंत्र ‘कोकण लोककला महामंडळ’ स्थापन करणे, वृद्ध कलाकार मानधन योजनेची वार्षिक उत्पन्न मर्यादा ६० हजार रुपयांवरून वाढवून १ लाख रुपये करणे, मानधनाचे प्रलंबित अर्ज तातडीने मंजूर करणे आणि कलावंतांना सराव व प्रशिक्षणासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांचे निवेदन मंत्री महोदयांसमोर मांडण्यात आले.
या भेटीदरम्यान मंडळाचे अध्यक्ष सुरेश ऐनारकर, उपाध्यक्ष सुरेश चिबडे, सरचिटणीस संतोष धारशे, चिटणीस सुधाकर मास्कर, सदस्य दामोदर गोरीवले, सुरेश कदम, सचिन धूमक, संतोष पारदले, उदय दणदणे, अप्पा फडकले, कृष्णा जोगळे, किशोर धनावडे तसेच शिवसेना विधानसभा संघटक एकनाथ सुकूम हे उपस्थित होते.
कलावंतांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्री भरत गोगावले यांना निवेदन
Leave a Comment





