सावर्डेत याच लाचखोर अनिल जाधव विरोधात आमदार निकमांकडे झाल्या होत्या तक्रारी !

Gramin Varta
463 Views

नागरिकांना वारंवार चकरा मारायला लावणे, फेरफार, सातबारा, वारस तपास कामे प्रलंबित ठेवणे असे प्रकार मुद्दाम करत होता

चिपळूण : सावर्डे येथील मंडळ अधिकारी अनिल दिलीप जाधव (वर्ग 3, महसूल विभाग) याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (५ ऑगस्ट) दुपारी रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, याच अधिकाऱ्याविरोधात काही दिवसांपूर्वी मनमानी कारभार, नागरिकांना हेलपाटे मारायला लावणे, आर्थिक व्यवहारांसाठी त्रास देणे आणि दादागिरी केल्याच्या गंभीर तक्रारी आमदार शेखर निकम यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या तक्रारींना आता जणू दुजोरा मिळाल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे निवृत्त मर्चंट अधिकारी आहेत. पत्नीच्या नावे मौजे सावर्डे येथे गट न. 1347/3 मधील 218 चौ. मी. जागा खरेदी खताने विकत घेतली होती. या जागेच्या सातबारा उताऱ्यावर तलाठी यांनी फेरफार नोंद करण्यास सांगून सदरचा फेरफार मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी अनिल जाधव यांची भेट घेतली होती यावेळी जाधव यांनी या कामासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही लाच स्वीकारताना जाधव याला रंगेहाथ पकडण्यात आले.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाग प्रमुख प्रणय प्रकाश चव्हाण यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत अनिल जाधव यांच्या मनमानी कारभारावर गंभीर आरोप केले होते. महसुली कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मुद्दाम त्रुटी काढून वारंवार चकरा मारायला लावणे, फेरफार, सातबारा, वारस तपास यांसारखी कामे प्रलंबित ठेवणे, आर्थिक व्यवहार होत नसल्यास कामात अडथळे निर्माण करणे, तसेच महा ई-सेवा केंद्र चालक आणि नागरिकांशी दादागिरीची वागणूक देणे, असे आरोप तक्रारीत करण्यात आले होते.

सावर्डे सर्कलमधील अनेक गावांतील नागरिकांनी संबंधित अधिकारी कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचीही तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या चौकशीसह बदलीची मागणी करण्यात आली होती.

आता त्याच अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्याने महसूल विभागातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या तक्रारी केवळ आरोप नव्हत्या का, याचीही चर्चा सुरू झाली असून संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Total Visitors :
4645777
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *