मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा फटका ; लांजा श्रीराम पुल येथे मुसळधार पावसामुळे घराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी

Gramin Varta
678 Views

नगराध्यक्षा सावली कुरूप व नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांनी दिली भेट

लांजा/अरबाज नेवरेकर:-लांजा शहरातील श्रीराम पुल परिसरात   सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाचा फटका स्थानिक नागरिकांना बसत असून, आज पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सलीम अकबर नेवरेकर यांच्या घराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले. त्यामुळे काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. पावसाचे पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून समस्या मांडली.

घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा सावली सुनिल कुरूप आणि नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतली व पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

त्यानंतर नगराध्यक्षा सावली सुनिल कुरूप आणि नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांनी महामार्गाचे काम करणाऱ्या ईगल इन्फ्रा कंपनीचे नरेश शितलानी यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी बोलवून सद्यस्थितीची माहिती दिली.

पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनीही परिस्थितीची दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मिळाली. परिसरातील नागरिकांनीही या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Total Visitors :
4659806
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *