माथेरानची सफर ठरली अखेरची… पळसदरीजवळच्या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू!

Gramin Varta
161 Views

कर्जत: कर्जत-खोपोली ५४८/अ महामार्गावरील पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठाजवळ गुरुवारी सकाळी वॅगनार कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील अंबरनाथ येथील सोनाली यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक रोहित वाघमारे गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपूर्ण रस्ता आणि सुरक्षेच्या अपुऱ्या उपाययोजनांबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ताकई येथील मित्रांचा एक गट साजगाव येथील चालकासह माथेरानकडे जात असताना पळसदरी येथे समोरून येणाऱ्या वॅगनार कारची रोहित वाघमारे यांच्या दुचाकीशी जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतनी भीषण होती की, दुचाकीवरील सोनाली यांचा जागीच प्राण गेला, तर गंभीर जखमी झालेल्या रोहित वाघमारे यांना तातडीने उपचारासाठी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर श्री स्वामी समर्थ मठाची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि स्थानिक नागरिकांनीही धाव घेऊन मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात हलविण्यास सहकार्य केले. मात्र, या मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून काही भागात रस्ता अचानक अरुंद होतो. तसेच इशारा फलक, परावर्तक आणि सुरक्षा बॅरिकेड्सचा अभाव असल्याने या मार्गावर जीवघेणे अपघात नित्याचेच झाले आहेत. रस्त्यासाठी संपादित जमिनीचा मोबदला अनेक शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षांपासून मिळालेला नसल्याने काम रखडल्याचा गंभीर आरोपही नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाची कर्जत पोलीस सखोल चौकशी करत असून, प्रशासनाने या मार्गाचे काम तातडीने पूर्ण करून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी आर्त हाक नागरिकांमधून दिली जात आहे.

Total Visitors :
4656585
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *